Sunday 4 September 2016

आमच्या कुटुंबावरची अक्षरछाया

विगं: आमच्या कुटुंबावरची अक्षरछाया

काल विग गेल्याचं कळलं आणि पस्तीस वर्षांचा दुवा निखळला. एक अनामिक नाते संपले.
विग कानिटकर नात्याने नसले तरी अनेक अर्थाने माझे काकाच होते. त्यांची अक्षरछाया सदैव आमच्या कुटुंबावर होती.त्यांच्या अक्षरछाया या अनिल भागवत यांनी बांधलेल्या, आतून बाहेरून दगडी बंगल्यात माझा आणि गौरीचा संसार १९८१ मध्ये खर-या अर्थाने सुरु झाला. तो बंगला बिन-भिंतींचा होता.( आता तो तिथे नाही.) संसारात कोणत्याच भिंती असू नयेत असं सांगणारा...पारदर्शी.( पण मला कुणाचे सांगणे ऐकायचे येत नसल्याने बंगल्याचे सांगणे मला कसे ऐकू येणार?) तिथे ते नव्हते रहात सुरुवातीला. पण तरीही रोज येत. आम्ही दोघे कामावर गेलो तरी थांबत. त्यांना ती अभ्यासिका करायची होती. म्हणूनच बंगला बांधला होता. पण माझे वडील अप्पा आणि श्री.. जोशी यांच्या शब्दाला मान देत त्यांनी आम्हाला भाड्याने दिला.१९८१मध्ये बिबवेवाडीत बंगला हे फार्म हाउस वाटावे अशी परिस्थिती होती. आणि वर्षानुवर्ष अगदी शेवटापर्यंत सदाशिव पेठेत राहणा-या माणसाला तेंव्हा ते नक्कीच वाटले असणार!ते यायचे, थांबायचे, वेळ असला तर हक्काने चहा करायला सांगायचे. गौरीला तर ते एक मिश्कील सासरेच वाटायचे. त्यांच्या इतका मिश्कीलतेने भरलेला चेहेरा आजपर्यंत मी पाहिलेला नाही. त्यांच्या भावना बोलण्यात येण्या अगोदर डोळ्यात चमकायचा.त्यांनी निगराणी केलेल्या अतिसुंदर हिरव्या गार lawn वर आमचे कितीतरी आपुलकीचे लोक येतअसत. आणि त्या सगळ्यांना असा वेगळा बंगला हे दगडी आश्चर्य बघायला अतिशय कुतुहूल वाटायचे.एकदा गौरीच्या एका बहि‍णीने विचारलं, “ अशा दगडी भिंतींच्या घरात भिंती जवळ जायची सोय नाही नाही?” गौरी म्हणाली, एका प्रकारानं ते बरंच आहे. सांभाळून रहावं लागतं!’आज मला वाटतं, अक्षरछाया बंगला किती बोलका होता. सांगायचा नव्या जोडप्याला-घरात नसाव्यात भिंती. असावी सोय कोणत्याही कोप-यातून एकमेकांना दिसण्याची. भिंती असायलाच हव्यात घराचा परीघ ठरवण्यासाठी. पण या भिंतीचं सदैव हवं भान. ते हरवलं तर नात्यातील संपेल जान!

 असं बोलकं आणि पती पत्नी नात्याला जपण्यासाठी सदैव भानावर ठेवायला भाग पाडणारचं घर बांधणा-या विनायक गंगाधर कानिटकर यांच्या सारखी निर्मळ मनोवृत्तीच हवी.( म्हणून का काकूचं नाव निर्मला होतं?)

अक्षरछाया मध्ये रहात असताना अनेक पहिल्या गोष्टींचा आमच्या संसारात प्रवेश झाला. पहिला मुलगा, पहिली स्वतःची स्कूटर,फ्रीज, मिक्सर,  स्टोव्ह च्या ऐवजी गॅस....कितीतरी. आणि प्रत्येक नव्या वस्तूचा आनंद आमच्या इतकाच विगं घेत असत.

माझ्या जीवनातील त्यावेळच्या सर्वात महत्त्वाच्या निर्णयाला विगंचा सहभाग अमूल्य होता. मी स्वतंत्रपणे प्रकाशक बनण्याची तयारी करीत होतो. नव्या प्रकाशकाला चांगली पुस्तके कोणी देत नाहीत. अगदी नव्या लेखकाला सुद्धा मोठे प्रकाशक हवे असतात. आणि लेखक नवा मी नवा तरीही प्रकाशन व्यवसायात नवीन कल्पना घेऊन येणारे अनिल भागवत यांचं पुस्तक “घर पहावं बांधून” अक्षरछाया प्रकाशनाला मिळवून देण्याचे निर्विवाद श्रेय विगंचंच. त्यांनी अनिलला शब्द दिला आणि मग मोठ्या रसिकतेनं, पुस्तकाच्या या प्रकरणाचे प्रायोजक आहेत......अशा जाहिराती पुस्तकात छापण्यास सुरुवात करणारं पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालं. या बद्दलची कृतज्ञता मी विसरू शकत नाही. पुढे त्यांची लाटा, जोगवा ही पुस्तकंही मी काढली. माओची सुधारित आवृत्तीही मी काढायचे ठरले. पण तेंव्हा प्रकाशन व्यवसाय गुंडाळण्याच्या मार्गावर होतो. असो. माझा संपर्क माझ्या वैयक्तिक कारणांमुळे कमी कमी होत गेला.

पण माझा धाकटा मुलगा तन्मय हा हिटलरने भारावून गेला होता. त्याची आणि विगं चे  आमच्या कुटुंबातील तीस-या पिढीशी मैत्रीपर्व सुरू झाले. ते आधी गुरु-शिष्याचे नाते मैत्रात कसे बदलले हे मला कळलेच नाही. ते वारंवार भेटत. अगदी  तन्मयची दहावी पूर्ण होण्या अगोदरच, हिटलर च्या बरोबरीने चर्चिल लिहिणारे विगं त्याला कमालीचे भावले. त्यांच्याकडून अनेक पुस्तके आणून तो वाचत असे. त्याला आम्ही, काय विगंच्या संग्रहातील पुस्तकं संपवणार काय असा प्रश्न विचारात असू.

निर्मलाताई गेल्यावर ते जास्त खंतावले. गुडघे दुखी पाठ सोडेना. त्यांच्या जवळचे सगळे एक एक करत या धरतीला अलविदा करत होते. श्रीगमा, ,पुंडलिक, पारगावकर, गवा बेहेरे, मोकाशी माधव कानिटकर एका पाठोपाठ त्यांचा निरोप घेऊन गेले. तरीही उमेद होती. अनिल-शोभा, रवी बेहेरे, दिलीप माजगावकर यांच्याशी ते सानिध्यात होते.
पण गेली चार पाच वर्षे त्यांची प्रकृती नीट नसायचीच. त्यांच्या वेळा पाळणे सांभाळत तन्मय जात राहिला.
विगं गेल्यावर त्याच्या तीस-या आजोबांना, ज्यांचा त्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोठा आपुलकीचा वाटा होता तो शेवटचा धागा ही संपला.
पण ज्या माणसाने आमच्या अवघ्या कुटुंबावर अक्षरछाया दिली तो वृक्षच आता नाही.!
एका प्रकारे वेदना एकटेपण रितेपण यातना यातून त्यांना मुक्ती मिळाली.
आता अशी अक्षरांची सावली शोधण्यासारखे वृक्षही कमी शिल्लक आहेत.
आता आम्हालाच आमचा शब्द छायेचा शोध घ्यावा लागणार आहे........

महेंद्र कानिटकर.